पणजी - केंद्रीय मंत्री अभिनेत्री स्मृती इराणी ( Smriti Irani ) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांची मुलगी जोश इराणीमुळे वादात सापडल्या आहेत. वास्तविक, स्मृती यांची मुलगी गोव्यात सिली सोल नावाचा कॅफे बार ( Bar And Restaurant ) चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की, ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी (2021) मृत्यू झाला आहे.
स्मृती इराणींच्या मुलीच्या सिलीसोल कॅफेबाहेर गोवा महिला काँग्रेसने शनिवारी संध्याकाळी आंदोलन करत इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. इराणी यांच्या कॅफेला परवानगी देण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. इराणी यांच्या या कॅफेचे एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
अमित पाटकर म्हणाले की, गोव्यात सीली सोल कॉफे जो स्मृती ईराणींच्या नातेवाईकाचा आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली पाहिजे. स्मृती ईराणी यांनी राजीनामा दिला पाहिजे. एका व्यक्तीने डिसेंबर 2020 मध्ये आधार कार्ड तयार केले. त्यानंतर जानेवारी 2021 एक्साईज लाईसन्ससाठी प्रस्ताव दिला. गोव्याच्या एक्साईज नियमानुसार लाईसन्ससाठी तुम्हाला रेस्टॉरंट असायला हवे. मात्र, रेकॉर्डवरून मिळालेल्या माहितीनुसार तिथे रेस्टॉरंट नव्हतेच. आधी लायसन्स घेतले आणि मग रेस्टॉरंट सुरू केले. हा पहिला घोटाळा आहे. त्यांनी ज्यांच्या नावावर लायसन्स घेतले आहे, तो माणूस 17 मे 2021 मृत झाला आहे. 22 जून 2022 ला त्या माणसाचे भूत येते आणि लायसन्ससाठी अर्ज करते. त्यावरुन सरकारने त्यांना लायसन्स दिले, हा आणखी मोठा घोटाळा केला आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला आहे.
राजीनाम्याची मागणी - दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणी स्मृती इराणी यांच्या राजीनामाची मागणी केली. शनिवारी संध्याकाळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या कॅफे बाहेर आंदोलन करत इराणी यांचा पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हेही वाचा - 50 बंडखोर आमदारांना मनसेत प्रवेश देणार का? राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका