भोपाळ - राजधानी भोपाळमध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. भरदिवसा वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. भोपाळच्या कोहेफिजा पोलीस स्टेशन परिसरातील मूनलाइट मॅरिज गार्डनसमोर चोरांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये कार लांबवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सुरवातीला दोघांपैकी एक जण गाडीपासून थोड्या अंतरावर उभा राहून मॉनिटर करत होता. तर दुसरा गाडीजवळ उभा असल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. गाडीचा मालक जवळपास नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी लांबवली.
संबंधित गाडी परवेझ खान या व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. परवेझ खान हा रेल्वे स्थानकाजवळ फास्ट फूड शॉप चालवतो. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मूनलाईट गार्डनमध्ये आला होता. समारंभानंतर परवेझ आणि त्याचे कुटुंब बाहेर आले. तेव्हा त्यांना गाडी सापडली नाही. त्यानंतर तातडीने परवेझ यांनी कोहेफिजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात तक्रार नोंदवली. गार्डनसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुण गाड्या चोरताना दिसले. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही चोरांचा शोध घेत आहेत.