News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - आजच्या महत्त्वाच्या बातम्या
आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, दरम्यान आज विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून निदर्शने देखील केली जाऊ शकतात. विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अधिवेशनामध्ये आज कोरोना काळातील शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता
सध्या राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यातच राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या परीक्षा कशा घेतल्या जाणार, ऑफलाईन की ऑनलाईन घेण्यात येणार? कोरोना काळात सरकारचे शैक्षणीक धोरण काय असावे? यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चामध्ये पदवीधर आणि शिक्षक आमदार सहभागी होण्याची शक्यता आहे.
आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक
5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह भाजपमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
आज दक्षिण प्रादेशिक परिषदेची 29 वी बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार
अध्र प्रदेश येथील तिरुपतीमध्ये आज दक्षिण प्रादेशिक परिषदेची 29 वी बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमित शहा असणार आहेत. या बैठकीला दक्षिणेकडील 8 राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, तसेच मुख्य सचिव यांची उपस्थिती असणार आहे.
आज अपर्णा पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी
अमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर आज सुप्रिम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 'तांडव' या वेब सिरिजवर हरकत घेत, अपर्णा पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेबसिरिजमधून एका विशिष्ट धर्माची बदनामी करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान अपर्णा यांचा अटकपूर्व जामीन अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला होता, त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
योगी आदित्यनाथ करणार गोरखपूरमधील खत कारखाण्याची पाहाणी
गोरखपूरमध्ये देशातील मोठा खत कारखाना उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कारखान्याचे लोकार्पण जुलैमध्ये होणार आहे. त्यापुर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज या कारखान्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच कामाचा देखील आढावा घेणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचा आज 48 वा स्थापना दिवस
झारखंड मुक्ती मोर्चाचा आज 48 वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व काळजी घेऊन कार्यक्रम साजरे केले जातील अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.