हैदराबाद : आपल्यापैकी बऱ्याच जणांना विरंगुळा म्हणून समुद्रकिनारी जायला आवडते. समुद्रकिनारी आपल्याला बहुतांशी पांढरी वाळू आढळते. मात्र, कर्नाटकमध्ये एक असा समुद्रकिनारा आहे, जिथे चक्क काळी वाळू आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील या समुद्रकिनाऱ्याला माजलीचा तिलमटी किनारा म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील काळी वाळू बघून पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात.
तिलमटी समुद्रकिनाऱ्याची एक विशेष बाब म्हणजे तिलमटीच्या डावीकडे माजली समुद्रकिनारा आहे. तर, उजवीकडे पोलम बीच आहे. पोलम बीच हा गोव्याच्या सीमेवर आहे. माजली आणि पोलम या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवर पांढरी वाळू आहे. मात्र केवळ तिलमटी इथं काळी वाळू आणि काळे कातळ आहेत. येथील वाळू आणि डोंगराचा रंग काळा का आहे, याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही.
तिलमटीच्या समुद्रकिनाऱ्यासोबतच, येथे येणाऱ्या लाटाही विचित्र आहेत. तिलमटी समुद्रकिनारा आणि पहाडांमध्ये एक प्रकारचा खड्डा आहे, जो इतर किनाऱ्यांवर दिसत नाही... तिलमटीचे नाव कोकणी शब्द 'टिल्लू'वरून ठेवण्यात आलं आहे.. ज्याचा अर्थ तीळ आणि माती असा आहे. तिलमटी समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक इथं येतात... सुट्टीच्या दिवसांत इथं पर्यटकांची गर्दी असते..
सागरी विज्ञानाचे एक अभ्यासक सांगतात, की येथे असलेल्या काळ्या खडकांना समुद्रातील लाटा फोडून टाकतात. त्यामुळे येथील वाळूचा रंग काळा आहे. तिलमटीच्या समुद्रकिनारी सूर्यास्ताचे खूप सुंदर फोटो काढता येतात. इथली चमकणारी काळी वाळू बघणं एक आल्हाददायी अनुभव असतो. वाळूला वेगळा रंग देणाऱ्या खडकांवर पहुडल्यावर या यात्रेचे पैसे वसूल झाल्याचा आनंद मिळतो.
हेही वाचा : देशातील असे पहिले गाव, जिथे प्रत्येक घर मुलीच्या नावाने ओळखले जाते