श्रीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद उबेद मलिक याला अटक केली आहे. तो पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरशी सतत संपर्कात होता. पोलीस अधिकाऱ्यांना तपासातून कळले की, तो सैन्य आणि सुरक्षा दलांच्या गुप्त हालचालींची माहिती पाकिस्तानस्थित कमांडरला देत होता.
खोऱ्यातील विविध भागात शोधमोहीम राबवली : जम्मू-काश्मीरमध्येच G20 देशांची बैठक होणार आहे. या परिषदेच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण खोऱ्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे खोऱ्यातील विविध भागात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारी अनेक दस्तऐवज जप्त केले आहेत. याशिवाय एनआयएने त्याच्याकडून आयईडी, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच एनआयएने त्याच्याकडून रिमोट कंट्रोल केलेले चिकट बॉम्बही जप्त केले आहेत.
श्रीनगर येथे G20 टुरिजम वर्किंग ग्रुपची बैठक : भारताच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या G20 टुरिजम वर्किंग ग्रुपची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून श्रीनगर येथे होणार आहे. दल सरोवराच्या किनारी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे याचे आयोजित केले जाईल. यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिषदेला पाकिस्तानकडून सातत्याने विरोध केला जात आहे. चीन आणि तुर्कीने या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, बीएसएफ आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळाच्या त्रिस्तरीय सुरक्षेत तैनात आहेत.
खोऱ्यात सुरक्षा वाढवली : विशेषत: श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दल सरोवर आणि चिनाब नदीतही सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिनाब नदीत विशेष बोटीद्वारे गस्त वाढवण्यात आली आहे. एका जवानाने सांगितले की, 'बोटची रात्रंदिवस गस्त सुरू आहे, त्यासोबत पायी आणि वाहनांवरही गस्त घालण्यात येत आहे. राजौरीमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांकडून सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. तत्पूर्वी शनिवारी, सीआरपीएफच्या वॉटर विंग आणि क्विक अॅक्शन टीम यांनी दल सरोवराच्या पाण्यात एक संयुक्त मॉक ड्रिल आयोजित केले होते. या आधी शुक्रवारी सीआरपीएफ कमांडोंनी दल सरोवरात विशेष सराव केला.
हेही वाचा :
- G20 Meet Security : G20 दरम्यान 26/11 सारख्या हल्ल्याचा कट उघड, विदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी बदल
- हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण
- Pakistani Drone Shot: अमृतसरमध्ये अंमली पदार्थ घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले; दोन दिवसांत बीएसएफची चौथी कारवाई