श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका उच्च कमांडरसह हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पहलगाम, अनंतनाग येथील श्रीचंद टॉप जंगल परिसरात दहशतवादी उपस्थितीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या आधारे, सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. ईटीव्ही भारतशी बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या सरचंद टॉप वन परिसरात लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत ५७ वर्षीय मुहम्मद अश्रफ खान उर्फ मौलवी ठार झाला आहे. तो A++ श्रेणीचा अतिरेकी होता.
ते पुढे म्हणाले, "आतापर्यंत तीन अतिरेकी मारले गेले आहेत. अश्रफ मौलवी, रोशन जमीर आणि रफिक अहमद अशी त्यांची नावे आहेत." अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 6 मे 2020 रोजी रियाझ नायकूला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडसाठी मौलवीचे नाव प्रमुख होते. मात्र, त्याऐवजी सैफुल्लाची निवड करण्यात आली आणि त्याच्या हत्येनंतर जुबेर वानी याने हिजबुलचा ताबा घेतला. मोलवी हा अनंतनागचा रहिवासी होता आणि 2013 पासून हिजबशी संबंधित होता.