थुथुकुडी - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होते याची तुम्हाला कल्पना असेलच. त्यामुळे अनेक प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, लोक प्लास्टिकच्या बॉट्लसचा वापर करून सर्रास फेकून देतात. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून शौचालय तयार केले आहे. तामिळनाडूमधील थुथुकुडीमध्ये घनकचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत कोरोना केंद्रांकडून रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून शौचालय बांधण्याचे काम थूथुकुडी महामंडळाने केले आहे. विटांचा वापर करून बांधकाम करण्याच्या किंमतीपेक्षा बाटल्यांचा वापर करून बांधकाम करणे परवडणारे असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तामिळनाडू सरकार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन देत आहे. घनकचरा व्यवस्थापन यासारख्या सामुदायिक प्रकल्पांनाही प्राधान्य दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून, थुथुकुडी महामंडळाने प्रथमच फेकलेल्या बाटल्यांचा वापर करत शौचालय बांधण्याचा प्रयोग केला.
विल्हेवाट लावलेल्या पाण्याच्या बाटल्या आरोग्य कामगारांकडून गोळा केल्या जातात आणि पेरुरामपुरम घनकचरा व्यवस्थापन केंद्रात आणल्या जातात. महामंडळाचे आयुक्त जयसीलन यांनी प्रायोगिक तत्वावर प्लास्टिकच्या बाटल्यांनी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबधित प्रकल्प आराखडा जिल्हा प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मंजुरी मिळाल्यानंतर बाटल्सपासून शौचालय उभारण्यास सुरवात करण्यात आली. या बाटल्समध्ये समुद्रामधील वाळू भरून त्यांचा वापर केला जात आहे. याप्रकारे प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी एक संदेश आहे. हा पुढाकार भविष्यातील चांगल्या निसर्गाच्या बाबतीत आशेचा संदेश देईल, यात शंका नाही.