मुंबई - शेअर बाजारात चढ-उतार सुरुच आहे. त्यामुळे गुंतवणूकदार देखील संभ्रमात आहेत. शेअर बाजारात आज गुरूवार (दि. 2 जुन)रोजी सलग तिसऱ्या सत्रात घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात ( Global Market ), आशियापासून युरोप आणि अमेरिकेपर्यंत जवळजवळ सर्व बाजारपेठा लाल चिन्हावर आहेत, ज्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांवरही परिणाम होईल.
कालच्या सत्रात 185 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 55,381 वर बंद झाला, तर निफ्टी 62 अंकांनी घसरून 16,523 वर पोहोचला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आज गुरुवारी बाजार सलग तिसऱ्या सत्रात खाली जाऊ शकतो. ( Share Market ) याआधी सेन्सेक्सने तीन सत्रांत 2,100 अंकांची वाढ नोंदवली होती. गेल्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांनी टेक, फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती.
अमेरिकेतील नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीने गुंतवणूकदारांची निराशा झाली. हे आकडे ना महागाईवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहेत किंवा विकास दराला योग्य गती देऊ शकत नाहीत. ( Investors ) त्यामुळे फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात न करण्याच्या आशाही संपुष्टात आल्याचे दिसत असून, त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. मागील सत्रात डाऊ जोन्स 176.89 अंकांनी (0.54%) घसरला, तर S&P 500 30.92 अंकांनी (0.75%) आणि Nasdaq Composite 86.93 अंकांनी (0.72%) घसरला.
अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे युरोपातील सर्व प्रमुख शेअर बाजार शेवटच्या सत्रात कोसळताना दिसले. युरोपातील जर्मनी शेअर बाजार शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 0.33 टक्क्यांनी घसरला, तर फ्रेंच शेअर बाजार 0.77 टक्क्यांनी घसरला. लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्येही मागील सत्रात 0.98 टक्क्यांची मोठी घसरण झाली.
आशियाई बाजार लाल चिन्हावर उघडले - आज सकाळी आशियातील जवळपास सर्व शेअर बाजार लाल चिन्हावर उघडले आहेत. सिंगापूरचे स्टॉक एक्स्चेंज 0.43 टक्के आणि जपानचे निक्केई 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय हाँगकाँगमध्ये 1.26 टक्के आणि तैवानमध्ये 0.52 टक्के घट दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.92 टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय कंपोझिट 0.45 टक्क्यांनी घसरत आहे.
हेही वाचा - राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज