मुबंई - या पाच दिवसात शेअर बाजाराचे चित्र फारसे समाधानकारक नव्हते. अशात आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. आज सेन्सेक्स 1,045 अंकाच्या घसरणीसह 51,495 वर सुरू झाला तर निफ्टी 85 अंकाच्या घसरणीसह 15,270 वर सुरू झाला.
गेल्या 5 दिवसांपासून सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारीही सेन्सेक्स 1046 अंकांनी घसरून 51 हजार 400 च्या जवळ बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 332 अंकांनी घसरून 15,300 च्या जवळ बंद झाला.
निफ्टीने 15660-15700 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. ही पातळी आता निफ्टीसाठी रझिस्टंस बनली आहे. कोणत्याही घसरणीत, निफ्टीला 15315 वर थोडा सपोर्ट मिळू शकतो. हा सपोर्टही तुटला तर निफ्टी पुढील काही दिवस किंवा आठवड्यात 14340 च्या दिशेने जाऊ शकतो.
फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ झाल्याने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्के वाढ जाहीर केली आहे. 28 वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे.
अमेरीकेत महागाई दर हा 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात हा महागाई दर 8.6 टक्के नोंदवला गेला. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या सेंट्रल बँकेने यावर तोडगा म्हणून व्याजदरात वाढ केली आहे. 0.75 टक्क्यांनी झालेली ही व्याजवाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. सध्या यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.
हेही वाचा - मी धर्मासोबत उभा आहे आरएसएस अन् मोहन भागवत यांच्यासोबत नाही -स्वामी निश्चलानंद सरस्वती