जयपूर : राजस्थानच्या जालोरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसांमध्ये एका मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
जालोर जिल्ह्याच्या रायपुरीयामधील रहिवासी ईश्वर सिंह यांची मुलगी कृष्णा, आणि बैरठ गावचा शैतान सिंह यांचे ३० एप्रिलला धूमधडाक्यात लग्न झाले होते. लग्नाचे सर्व विधी मोठ्या आनंदाने पार पाडून कृष्णा आपल्या सासरी आली होती. मात्र, तिचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. लग्नाच्या नऊ दिवसांनंतरच शैतानसिंहचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न होऊन घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शैतानसिंहची तब्येत बिघडली होती. यानंतर तपासणी केली असता, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शैतानसिंहची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच गेली. अखेर ९ मे रोजी त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
सोशल मीडियावर घटना व्हायरल..
ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. कोरोनामुळे कशा प्रकारे एका आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, आणि त्यामुळे लोकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या मेसेज सह कृष्णा आणि शैतान यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
![Death after 9 days of marriage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/rj-jlr-01-corona-suhag-karshna-kanvar-avb-rj10031_10052021202737_1005f_1620658657_1093.jpg)
मुख्यमंत्र्यांनी समारंभ टाळण्याचे केले आवाहन..
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही कोरोनाचा प्रसार पाहता लग्नसमारंभ टाळण्याचे आवाहन लोकांना केले आहे. मात्र, सरकारने यावर पूर्णपणे बंदी लागू केली नाही. लग्नात आता केवळ ११ लोक उपस्थित राहू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यास अवघ्या पाच मिनिटांचा उशीर; ११ रुग्णांनी गमावले प्राण