पाली - सरकारी काम करणाऱ्या लोकांची चप्पल झिजून जाते, अशी म्हण आहे. असेच एक उदाहरण अजमेरमध्ये घडले. २३ दिवसांपूर्वी अजमेरमधील ब्यावर जिल्ह्यातील जालिया ग्रामपंचायतीतील रुपावास गावात राहणाऱ्या भैरुसिंह याची पत्नी ललिता हिने विमान प्रवास करताना मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या वेळेस विमानातील सर्व प्रवाशांनी त्या दोघांना मदत केली आणि मुलाच्या जन्मानंतर दोघांचे अभिनंदन केले. मात्र, यानंतर त्या पालकांना नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्या मुलाचा जन्म विमानात झाला आहे. त्यामुळे जन्म ठिकाण लिहिताना समस्या येत आहेत. भैरुसिंहच्या मुलाच्या जन्मानंतर २२ दिवसानंतरही त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. मुलाचे पालकही जास्त शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना जयपूर ते अजमेर अशा सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे.
जयपूर एयरपोर्ट प्रशासनाकडून प्रतिसाद नाही...
याबाबतीत भैरुसिंह यांनी सांगितले, की मला मुलाच्या जन्मानंतर कागदपत्रे मिळविण्यात अनेक अडचणी येत आहेत. मला जेथे जाण्यास सांगत तेथे मी जात आहे. मी अनेक वेळा याबाबत माहिती काढण्यासाठी जयपूर एयरपोर्टवर फोन केला होता. पहिल्यांदा एक दोन वेळेस ते माझ्याशी बोलले. मात्र नंतर त्यांनी फोन उचलणे बंद केले. याबाबत जयपूर एयरपोर्ट अथॉरिटीला विचारले असता, त्यांनी याबाबात बोलण्यास नकार दिला. मी जयपूरला कोणालाही ओळखत नाही. एवढी मेहनत करूनही माझ्याकडे मुलाचे जन्म प्रमाणपत्र नाही.
मुलाचे वडिल रिक्षाचालक....
मुलाचे वडिल अजमेरमधील ब्यावर जिल्ह्यातील जालिया ग्रामपंचायतीतील रुपावास गावात राहणारे आहेत. ते बंगळुरूमध्ये रिक्षाचालक आहेत. ते आपल्या पत्नीसोबत बंगळुरूमध्ये राहतात. त्यांची पत्नी गरोदर होती आणि गावाला वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने इंडिगो एयरलायन्सचे तिकीट काढून गावाला आले. गावाला आल्यावर भैरुसिंहने पत्नीची वैद्यकीय सपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, की पत्नीची तब्येत ठीक असून ती प्रवास करू शकते असे सांगितले होते.