डिंडोरी (मध्य प्रदेश) - महाराष्ट्र राज्याचे भाजपचे सह प्रभारी आणि केंद्रीय मंत्री ओम प्रकाश धुर्वे यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव आणि गृहमंत्री अनिल देशमुखांवरील 100 कोटी खंडणीच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीला ठाकरे सरकार जबाबदार आहे. तर, देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप सिध्द झाले आहेत, असे ओम प्रकाश धुर्वे यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुखांवरील आरोप सिध्द झाले -
डिंडोरी जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत ओम प्रकाश धुर्वे बोलत होते. 'महाराष्ट्रात अनलॉकनंतर पुन्हा कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. आता तर दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढतच चाललली आहे. तर, ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिना 100 कोटी रूपये वसूली करण्याचे आदेश दिले होते, असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावले आहेत. आता हे आरोपही सिध्द झाले आहेत' असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी ठाकरे सरकार सक्षम नाही -
'ठाकरे सरकारचे कोरोना प्रतिबंधाबाबत ढिसाळ नियोजन आहे. शिवाय, कोरोनाशी लढण्यासाठीही राज्य सरकार सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. कोरोना रूग्णसंख्या पाहिली तर संपूर्ण भारतात महाराष्ट्र एकीकडे आणि इतर राज्ये एकीकडे, अशी परिस्थिती आहे', असे धुर्वे यांनी म्हटले. त्यामुळे नागरिकांनी जागरूक व्हावे. सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर बंधन घातले आहे, असेही ते म्हणाले.
पोलीस स्फोटकं ठेवतात ही शरमेची बाब -
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांबद्दल ओम प्रकाश धुर्वे म्हणाले, की ' देशमुखांवरील आरोप सिध्द झाले आहे. तेथीलच एका मोठ्या अधिकाऱ्यानेच हे आरोप केले आहेत. शिवाय तपास यंत्रणांच्या कामातूनही आरोपांचे निष्कर्ष समोर आले आहेत. तरीही निर्लज्जपणाचा कळस आहे. तेथे शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी सचिन वाझेंना पुन्हा कामावर घेतले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींबद्दल आम्हाला गर्व आहे. अशा मोठ्या व्यक्तीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार एक पोलिस अधिकारी ठेवतो ही खूप शरमेची बाब आहे'.