इंदूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्त अहवालाच्या आधारे सरफराज मेनन नावाच्या तरुणाला इंदूरच्या चंदन नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. एनआयने मुंबई एटीएसला या प्रकरणी गुप्त माहिती दिली होती. मुंबई एटीएसने ती माहिती इंदूर पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे इंदूरच्या चंदन नगर भागात सरफराजच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्याचे आई - वडील घरी उपस्थित होते.
परदेशातून प्रशिक्षण घेऊन आला आहे : पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला ताब्यात घेतले आहे. सरफराजच्या पासपोर्टवर चीन आणि हाँगकाँगला जाण्यासाठी 15 नोंदी आहेत. 2007 मध्ये तो खजराना भागात राहायला आला होता. त्यानंतर त्याने तेथून घर विकले आणि ग्रीन पार्क कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला. मात्र पोलिसांनी छापा टाकलेल्या अपार्टमेंटमध्येही तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई - वडिलांना ताब्यात घेतले. जेव्हा त्याला याची माहिती मिळाली, तेव्हा तो पोलिसांकडे आला. चौकशीत एनआयए टीमला कळले की, सरफराज पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात परतला आहे आणि तो भारतात मोठी चळवळ राबवण्याची योजना आखतो आहे.
अमित शाहंच्या आजाराची अफवा उठवली होती : एनआयएच्या टीमने यापूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुंबई एटीएसला दिली असून मुंबई एटीएसने ती इंदूर पोलिसांना दिली आहे. चौकशीत समोर आले आहे की, 2020 मध्ये सरफराजनेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजाराच्या अफवा उठवल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात गुजरात पोलिसांनी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात सरफराज मेमनचे कोणते संबंध होते, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असून त्याचा अतिशय बारकाईने तपास केला जात आहे. पोलिसांचा तपास चालू आहे.
एनआयएने दिली होती माहिती : एनआयएने परवा या प्रकरणी मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. मुंबई पोलिसांना पाठवलेल्या अलर्ट नोटमध्ये एनआयएने म्हटले होते की, सरफराज मेमन नावाचा संशयित व्यक्ती दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याचा एका विदेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. संशयित दहशतवाद्याबाबत आणखी काही तपशील देताना राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला मेमन हा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. पोलिसांना रविवारी दुपारी हा ई - मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते.
हेही वाचा : Umesh Pal Murder Case : उमेश पाल हत्येतील आरोपीचा अखिलेश यादव सोबत फोटो व्हायरल, आरोपीला अटक