रोहतक - नेताजी सुभाष च्रंद बोस यांच्या 125 जयंती निमित्त कोलकातामधील व्हिक्टोरीया मेमोरियलमध्ये कार्यक्रमात जय श्री राम घोषणा दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. यावरून विश्व हिंदू परिषदचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी दीदींवर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी यांच्या सभेत 'अल्लाह हू अकबर' असे नारे लागतात. मग त्यांना 'जय श्री राम' घोषणांचा त्रास का, अशी टीका त्यांनी केली.
ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे जय श्री राम घोषणांवर प्रतिक्रिया दिली. ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होती. प्रभू राम हे एखाद्या धर्माचे, प्रदेशाचे नाहीत. ते एक महापुरुष आहेत. डॉ भीमराव अंबेडकर यांनी संविधानाच्या पहिल्या प्रतीच्या पृष्ठावर प्रभू राम यांचे चित्र लावले होते. कारण, प्रभू राम हे संपूर्ण देशाला जोडतात. रामाचा विरोध करणं सोप नाही. आतापर्यंत ज्यांनी रामाचा विरोध केला. ते सर्वांची काय अवस्था झाली हे सर्वश्रूत आहे, असे सुरेंद्र जैन म्हणाले.
दीदींना पाठवली रामायणाची प्रत -
मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि आमदार रामेश्वर शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. दीदी रामायणाचे वाचन करतील आणि प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील, अशी अपेक्षा आहे. तसेच इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत, असे रामेश्वर शर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटलं.
काय प्रकरण?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारकडून कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दाखल झाले. त्यांच्यासमवेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. यावेळी, ममतांना भाषणासाठी बोलावले असता तेथे उपस्थित लोकांनी पीएम मोदींसमोर जय श्री रामचा जयघोष करण्यास सुरवात केली. यावर बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी संतप्त होऊन या कार्यक्रमात बोलण्यास नकार दिला. तसेच घोषणा देणाऱ्या सुनावलं. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे.