नवी दिल्ली - कोरोना विषाणू आपले रूप बदलत आहे. भारतात सापडलेला कोरोना ‘डेल्टा व्हेरिएंट’ हा चिंतेचा विषय बनला आहे. दुसर्या लाटेदरम्यान ‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा खूपच जास्त आहे,. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्याही जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘डेल्टा व्हेरिएंट’ वर प्रभावी असा बूस्टर शॉट 'स्पूटनिक व्ही' आणणार आहे. हा बूस्टर शॉट कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’विरूद्ध काम करेल. स्पूटनिक व्हीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
भारतात सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ वर 'स्पूटनिक व्ही' अधिक प्रभावी आहे. डेल्टा प्रकार किंवा B1.617.2 स्ट्रेन हा भारतात पसरलेल्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं.
काय आहे डेल्टा व्हेरिएंट?
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचे नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. कप्पा आणि डेल्टा ही दोन नावं ग्रीक अल्फाबेट्सवरुन देण्यात आली आहेत.
'स्पूटनिक व्ही'लसीविषयी...
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. देशातील प्रत्येकाला लस मिळावी म्हणून रशियाच्या स्पूटनिक व्ही लसीला देशात मंजुरी देण्यात आली आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये 'स्पूटनिक व्ही' ही कोरोना लस देण्यात येत आहे. स्पूटनिक व्ही लशीची किंमत अपोलो रुग्णालयात 1 हजार 195 रुपये असणार आहे. स्पूटनिक व्ही लसीची किंमत 995 रुपये आहे. तर वरील 200 रुपये प्रशासन शुल्क आहे.
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे -
- 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड - 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक व्ही. असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
लसीचा बूस्टर शॉट काय असतो?
कोरोना लसीचे दोन डोस पुरेसे नाहीत. लसीपासून तयार झालेल्या अँटीबॉडीज संपल्यानंतर बूस्टर शॉटची गरज असते. बूस्टर डोस विशिष्ट प्रकारे कार्य करतात, त्याला इम्युनॉलॉजिकल मेमरी असे म्हणतात. बूस्टर मुख्य स्वरुपात लसीच्या एका किंवा दोन डोसनंतर काही काळाने देण्यात येणारा आणखी एक डोस आहे. थोडक्यात अधिक चांगल्या सुविधा असलेलं पुढचं व्हर्जन म्हणजे बूस्टर शॉट. लसीच्या पहिल्या दोन डोसला प्राइम डोस म्हणतात. त्यानंतर एका वर्षात किंवा त्यानंतर कधीही लशीचा आणखी एक डोस घ्यावा लागला तर त्याला बूस्टर डोस म्हटलं जातं. विषाणूचा नवा प्रकार आल्यानंतर जुना डोस काम करत नाही. तेव्हा जुन्या लसीत बदल करून त्याचा बूस्टर डोस व्यक्तीला दिला जातो