अक्षय पोकळे (नवी दिल्ली) - फनी चक्रीवादळाने शुक्रवारी सकाळीच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक दिली. त्यावेळी वाऱ्याची गती १७५ किमी प्रति तास होती. दरम्यान, वादळग्रस्त परिसरात मुसळधार पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही जोरदार वाऱ्याचा तडाखा बसला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मागील काही दिवसांपासून ओडिशा प्रशासनाने जोरदार तयारी केली होती.
ओडिशामधील गंजाम जिल्ह्याला या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता होती. मात्र, योग्य नियोजन आणि सतर्कतेच्या बळावर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळणे शक्य झाले आहे. यामागे 'मराठी' हात अहोरात्र झटत होता आणि तो म्हणजे गंजामचे मराठी जिल्हाधिकारी विजय कुलांगे.
मराठी माणसांचा डंका कायमच जगाच्या पाठीवर वाजत असतो. यावेळी आलेल्या फनी चक्रीवादळाने ओडिशासह आंध्रा आणि पश्चिम बंगालाही जोरदार तडाखा बसला आहे. यात गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी योग्य नियोजन करून नैसर्गिक आपत्तीच्या कठीण परिस्थितही या आपत्तीशी दोन हात केले. कुलांगे यांच्या देखरेखीखाली वादळाच्या आधीच तीन लाखाहूंन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तसेच गरोदर महिलांपासून ते पर्यकांनाही त्यांनी सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम केले आहे.
नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राजकीय नेत्यांपासून, प्रशासकीय अधिकाऱयाचाही मोठा वाटा असतो. त्यालाच अनुसरुन विजय कुलांगे यांनी वादळग्रस्त भागात मोठे काम केले आहे.
नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर -
ज्या भागात 'फनी'चा तडाखा बसणार होता त्या भागातील तब्बल ३ लाख नागरिक आणि जवळपास ५०० गर्भवती महिलांचे यावेळी सुरक्षित स्थळी स्थालांतर करण्यात आले. तसेच स्थलांतरित केलेल्या जागेवर त्यांच्यासाठी खाण्या-पिण्याची योग्य सोयदेखील करण्यात आली आहे.
ओडिशा सरकारने जिल्हाधिकारी कुलांगेंचे केले कौतुक
फनीच्या कचाट्यात ३ राज्य आले आहेत. यावेळी अनेक प्राण्यांनाही याचा फटका बसला आहे. विजय कुलांगे यांच्या नियोजनात अनेक प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मराठी माणसाच्या अचूक नियोजनामुळे या भागात झिरो कॅज्योलिटी झाली आहे. त्यामुळेच ओडिशा सरकारनेही मराठी असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांचे कौतुक केले आहे.
सध्याची स्थिती -
ओडिशानंतर सध्या फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले आहे. ओडिशात सध्यस्थिती पुर्ववत होत आहे. नेटवर्क सेवा, वीज, रस्ते वाहतूक सुरू झाली आहे. ज्या भागात या वादळाचा जास्त प्रभाव झाला तिथे अजूनही मदतकार्य सुरू आहे.
कोण आहेत विजय कुलांगे -
- १) २००१ मध्ये स्पर्धा परीक्षा देऊन ते सहायक विक्रीकर निरीक्षक झाले.
- २) २०१० मध्ये जामखेडचे तहसीलदार म्हणून ते नियुक्त झाले.
- ३) तहसीलदार असताना त्यांनी विविध शासकीय योजना राबवल्या आहेत.
- ४) २०११ मध्ये कुलांगे यूपीएससीत यशस्वी झाले.
- ५) सध्या ते ओडिशा राज्यातील गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.