मिर्झापूर (उत्तर प्रदेश) - कोविड-१९ लस नपुंसक बनवू शकते अशी लोकांना भिती वाटत आहे, असा दावा समाजवादी पार्टीचे (एसपी) नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या कोविड लस न घेण्याच्या वक्तव्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
लोकसंख्या कमी करण्यासाठी?
आम्हाला सरकारच्या यंत्रणेवर विश्वास नाही. अखिलेश यांनी हे तथ्यांच्या आधारे सांगितले आहे. जर ते स्वत: लसीकरण करणार नसेल, तर नक्कीच यावर संशय निर्माण होतो. यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. उद्या लोक म्हणतील, की ही लस लोकसंख्या कमी करण्यासाठी दिली गेली. तुम्ही नपुंसकही होऊ शकता, काहीही होऊ शकते, असे सिन्हा म्हणाले.
'...तर प्रत्येकाला मोफत लस'
अखिलेश लस घेणार नसतील, तर राज्यातील कोणत्याही व्यक्तीने ही लस घेता कामा नये, असेही ते म्हणाले. भाजपाप्रणित केंद्र सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे कोविड लस घेण्यास तयार नसल्याचे अलिकडेच अखिलेश यांनी जाहीर केले होते. भाजपावर विश्वास कसा ठेवायचा. आमचे सरकार आल्यास प्रत्येकाला मोफत लस मिळेल, असे लखनऊ येथील पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले होते.
'अजिबात संकोच करू नये'
कोविड लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे नागरिकांनी ती घेण्यास अजिबात संकोच करू नये, असे कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मंडे यांनी म्हटले होते. त्यानंतर अखिलेश यांनी या लसीवर शंका उपस्थित करत आपण ती घेणार नसल्याचे जाहीर केले होते. केंद्रिय आरोग्य मंत्रालयातर्फे पॅन इंडिया कोविड-१९ ही मोहीम चालवली जात आहे.