लखनऊ - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसाचारानंतर संपूर्ण देश राजकीय आखाडा बनला आहे. विरोधीपक्षातील अनेक नेत्यांना लखीमपूर जाऊन शेतकऱ्यांना भेटायचे आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लखीमपूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'येवढे अत्याचार इंग्रजांनीही नाही केले' -
भाजपा सरकार शेतकर्यांवर जेवढे अत्याचार करत आहेत, तेवढे इंग्रजांनीही केले नाहीत. गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम तिथे होता, त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांना 2 कोटी रुपये देण्यात यावे, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही अखिलेश यादव यांनी दिली आहे. यादरम्यान, ज्या ठिकाणी अखिलेश यादव हे धरणावर बसले आहेत. त्या ठिकाणांपासून काही अंतरावर पोलिसांच्या गाडीला आग लावल्याचा प्रकार घडला आहे.
यापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रात्री उशीरा लखीमपूरला रवाना झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना सीतापूरच्या हरगाव येथे ताब्यात घेतले. यावरून प्रियंका गांधी यांनी आक्रमक होत योगी सरकारवर निशाणा साधला होता. 'तुम्ही आम्हाला जबरदस्तीने घेऊन जात आहात. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. मी तुमच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करेल, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिली होती.
हेही वाचा - लखीमपू खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"