खांडवा - मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ट्रॅक्टर अपघातात नवरदेवासह सहा वऱ्हाडींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालवा पोलीस ठाणे परिसरात आज (गुरुवार) दुपारी ही घटना घडली. यामध्ये १५ ते २० वऱ्हाडी जखमी झाले असून त्यांच्यावर खांडवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी
जिल्ह्यातील मेहलू गावाजवळ दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. वऱ्हाडींनी भरलेला ट्रॅक्टर मोजवाडी येथून मेहलू येथे चालला होता. मात्र, मेहलू गावाजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. यामध्ये सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे १५ जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता. नवरदेवाचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.