भोपाळ - मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी बस काल (मंगळवार) कालव्यात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 50 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. सतना शहराकडे जात असताना रामपूर नेकिन येथील पाटन पुलिया या ठिकाणी बस कालव्यात कोसळली होती.
दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू -
दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अरुंद कच्च्या रस्त्यावरून जात असताना ही बस कालव्यात कोसळली. ही बस विद्यार्थ्यांना एएनएम (ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी)च्या परीक्षेसाठी सतना येथे घेऊन जात होती. पोलीस, राज्य आपत्ती निवारण पथके घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. जीवरक्षकांना पाचारण करण्यात आले असून कालव्याच्या पाण्यात बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.
सात प्रवासी सुरक्षित बचावले -
बसमध्ये एकूण ५८ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यापेक्षाही जास्त प्रवासी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बसमधील सात प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून घटनेची माहिती घेतली आहे. बचावकार्यात मदत होण्यासाठी बाणसागर धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रेनद्वारे मदतकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. मध्यप्रदेश काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अपघाताची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांकडून बचावकार्याचा सतत आढावा -
'ही खूप दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार दोन मंत्री घटनास्थळाकडे निघालो आहोत. संबंधित अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मृतदेह हाती लागले आहेत', असे मंत्री तुलसी सिलवात यांनी सांगितले होते. मृतांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत आणखी 50 मृतदेह हाती लागले आहेत.