बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या यांची वर्णी लागल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात कोणाच्या नावाचा समावेश राहणार याबाबतची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. दिल्लीत मंत्रिमंडळाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे दोघेही आजच बंगळुरूला पोहोचणार आहेत. शनिवारी 15 ते 20 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणाच्या नावाला मिळणार हिरवा कंदील : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळातील इच्छुकांची संख्या मोठी असून दोन्ही नेते आपल्या निकटवर्तीयांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत हायकमांडशी चर्चा करणार आहेत. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची यादी घेऊन हे दोन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डी के शिवकुमार यांनी आम्ही वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे आपल्या निवासस्थानी बोलताना सांगितले.
उद्या होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी : कर्नाटकची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी दुपारी कांतीराव स्टेडियमवर होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमात किमान 12 ते 15 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ रचनेत समाजनिहाय, क्षेत्रनिहाय, ज्येष्ठतानिहाय महिलांच्या प्रतिनिधीत्वाचा विचार केला जाणार आहे. बहुतांश ज्येष्ठांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग : कर्नाटकातील काँग्रेस आमदार मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत. काहींनी धार्मिक गुरुंच्या माध्यमातून दबावतंत्र सुरू केले आहे, तर काहीजण हायकमांडसोबत मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गुरुवारपासून अनेक आमदार सिद्धरामय्या आणि डीके यांच्या घरी जाऊन मंत्रीपदासाठी लॉबिंग करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश ज्येष्ठांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात कोणाचा होऊ शकतो समावेश : माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी परमेश्वर, माजी मंत्री के जे जॉर्ज, रामलिंगा रेड्डी, एम बी पाटील, आर व्ही देशपांडे, एच के पाटील, एम कृष्णप्पा, प्रियांक खर्गे, लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर, दिनेश गुंडूराव, कृष्णाबाईरेगौडा, एच सी महादेवप्पा, सतीश जारकीहोळी, यू टी खादर, ईश्वर खांद्रे, जमीर अहमद खान आणि लक्ष्मी हेब्बाळकर आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मंत्रिपदासाठी कोण आहेत इच्छुक : शरणप्रकाश पाटील, शिवलिंगेगौडा, शिवराज तंगडगी, पुत्तरंगशेट्टी, अल्लामप्रभू पाटील, शरणबसप्पा दर्शनपुरा, तन्वीर सेठ, सलीम अहमद, नागराज यादव, रूपा शशिधर, एस आर श्रीनिवास, चेलुवरायस्वामी, एम पी नरेंद्र स्वामी, मगदी बालकृष्ण, राघवेंद्र हितनल, बी नागेंद्र, के एच मुनियप्पा, आर बी थिम्मापुरा, शिवानंद पाटील, एस एस मल्लिकार्जुन, राहीन खान आणि बैराती सुरेश यांचा इच्छुक नावात समावेश आहे.
हेही वाचा -
- Karnataka CM : कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला ममता, नितीश, केसीआर यांना निमंत्रण
- Karnataka New CM : सिद्धरामैय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी शिवकुमार; 20 तारखेला शपथविधी सोहळा
- New Parliament House : नव्याने बांधलेल्या संसद भवनच्या उद्घाटनाची तारीख ठरली; PM 'या' तारखेला करणार देशाला समर्पित