नवी दिल्ली - शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पेगासस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, की पेगासस हेरगिरी प्रकरणात नाव असलेल्या दोन नेत्यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. प्रल्हाद जोशी आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांची नावेही हेरगिरी प्रकरणात सर्रासपणे पुढे आली आहेत. नंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. हेरगिरी केल्या गेलेल्या वैष्णव यांना त्याच खात्याचे म्हणजे आयटी खात्याचे मंत्री केले गेले आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
इस्त्रालयी कंपनीचे सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून नेत्यांपासून पत्रकारांची करण्यात येत असलेली हेरगिरीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याचे पडसाद सोमवारी संसदेच्या मान्सून सत्रातही उमटले. दरम्यान सरकारने फोन टॅपिंगच्या मीडिया रिपोर्ट्सचे खंडन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोन टॅप केल्याचा केंद्र सरकारवर आरोप लावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन कुणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही-
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हेरगिरी प्रकरणात सोमवारी माध्यांशी बोलताना सांगितले, की देशाच्या सुरक्षेविषयी हा मोठा खेळ आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या आधीच्या सरकारने काही प्रमुख लोकांचे फोन टॅप केले होते. हे टॅपिंग आता परदेशी कंपनीच्या माध्यमातून केले जाते. आज हा विषय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उचलला जाईल, असं ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, ज्या लोकांचे फोन टॅप त्यात मोठ्या संख्येने पत्रकार आहेत. पत्रकारांचे फोन टॅप करून काय करायचं होतं माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला का माहिती नाही. पण महाराष्ट्रातील सरकार बनत असताना अनेक लोकांचे फोन टॅप झाले होते, त्याची चौकशी सुरू आहे.