नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या या बजेटनंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची झोळी आज चांगलीच भरली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सातत्याने पडझड दिसून येत होती. मात्र आज बजेट मांडल्यानंतर शेअर बाजार वधारला.
ब्रॉडर मार्केटमध्ये आज बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप दोन्हीही चांगल्या गतीमध्ये दिसून आले. तर सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सदेखील 650 अंकांनी तेजीत दिसून आला. दिवसभराच्या कारभाराच्या सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्समध्ये 30 स्टॉक्समध्ये केवळ तीन स्टॉक्सच लाल निशाण्यावर दिसून आले.
सोमवारी दिवसभर कारभारानंतर मुंबई शेअर बाजार 2,314 अंकाने उसळी घेऊन म्हणजेच 5 टक्के वृद्धीसह 48,600 अंकांवर क्लोज झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीही 646 अंकांच्या वृद्धीसह 14,280 अंकांवर क्लोज झाला. आज इंड्सइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, एचडीएफसीच्या स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी पहायला मिळाली. तर यूपीएल, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टेक महिंद्रा, सिप्ला आणि हिंदूस्थान युनिलिव्हरच्या स्टॉक्समध्ये विक्री झाली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावेळी भाषण करत असताना शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला आज बाजार 401 अंकांनी वधारला. पण जेव्हा बजेटला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्सने थेट 800 अंकांनी उसळी घेतली होती.
बँकींग सेक्टर्समध्ये जबरदस्त तेजी
आज सर्वच क्षेत्रामध्ये वाढ दिसून आली. सर्वांत मोठी तेजी आज इंश्यूरन्स सेक्टर, बँकींग, कॅपिटल गुड्स, कन्झ्यूमर ड्यूरेबल्सच्या शेअर्समध्ये दिसून आली. मेटल स्टॉक्समध्ये देखील चमक दिसून आली. अर्थमंत्र्यांनी आज सरकारी बँकांच्या भांडवलावर 20 हजार कोटींचा खर्च करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इन्श्यूरन्स सेक्टरसाठी एफडीआयच्या नियमांअंतर्गत 49 टक्क्यांच्या मर्यादेला वाढवून 74 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणुकदारांच्या उत्साहात वाढ दिसून आली.