नवी दिल्ली - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येणाऱ्या 'कोविशिल्ड' या कोरोनावरील लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. आज (शुक्रवार) भारताचे औषध महानियंत्रक कार्यालयातील अधिकारी आणि कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भारतात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला लवकरच सुरूवात होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेका कंपनीशी सहकार्य करत सीरमने कोविशिल्ड लस तयार केली आहे.
कोरोनावरील तज्ज्ञ गटाची झाली बैठक -
भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीजीसीए) आणि केंद्र सरकारच्या कोरोनावरील तज्ज्ञ गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता भारतात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सीरम इन्सिट्यूट कंपनीने आधीच लसीचे सुमारे ५ कोटी डोस तयार करून ठेवले आहेत.
लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात -
जगभरात अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोना बाधित भारतात आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. लसीला मान्यता मिळाली असून तिची साठवणूक कशी होणार, वाहतूक सुविधा, कोल्ड स्टोरेज (शीतगृहात लस ठेवण्याची सुविधा), सर्वात आधी लसीकरण कोणाचे होणार हे एक मोठे आव्हान सरकारपुढे आहे. मागील काही महिन्यांपासून आरोग्य मंत्रालय आणि संबधीत विभागांनी संसाधनांची जुळवाजुळव सूरू केली आहे.
मोदींनी केला होता व्हॅक्सिन दौरा -
मागील वर्षी २८ नोव्हेंबरला मोदींनी भारतात तयार करण्यात कोरोना लसींच्या निर्मितीचा आढावा घेतला होता. गुजरात राज्यातील झायडस फार्मा कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली होती. तसेच सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली होती.
शीतगृहांची पडणार गरज
कोणत्याही आजारावरील लस सहसा शीतगृहात ठेवली जाते. जर अधिक तापमानाशी लसीचा संबंध आला तर तिची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, फायजर कंपनीने तयार केलेली लस उणे ७० डिग्री सेल्सिअल तापमानात ठेवण्याची आवश्यकता आहे. अंटार्टिका खंडावरील तापामानपेक्षाही कमी तापमानात ही लस ठेवावी लागते. त्यामुळे जर लाखो नागरिकांचे लसीकरण करायचे असल्याचे कोल्ड स्टोरेजची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. शीतगृहांची साखळी उभी केल्यास लसीकरण वेगाने होऊ शकते. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे लस ठेवण्याची क्षमता भारताकडे किती आहे हे आपल्याला पहावे लागेल. अनेक राज्य सरकारांनी लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे.
लस बनवणारी सीरम जगातील सर्वात मोठी कंपनी -
पुण्यातील सीरम कंपनी ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. कोरोनावरील लस निर्मितीतही कंपनीने आघाडी घेतली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेका कंपनीसोबत सीरमने लस निर्मितीसाठी सहकार्य करार केला आहे. त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात लसीची निर्मिती सीरमने केली आहे. आता भारत सरकारने कोरोना लसीला परवानगी दिल्याने काही दिवसांत भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
कोविशिल्ड ही लस सीरम कंपनी पुणे येथील प्रयोगशाळेत तयार करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीशी सीरमने सहकार्य केले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून भारतातील चाचणीचा खर्च उचलण्यात येत आहे. तर सीरमकडून लसनिर्मितीसाठी लागणारा इतर खर्च करण्यात येत आहे. लसीचे काही प्रमाणात डोसची निर्मितीही करण्यात आली आहे. कंपनीने आत्तापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगती पथावर आहेत. कोरोना लस पूर्णपणे तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीचे उत्पादन करण्यात येईल त्यासाठीची तयारीही सुरू आहे.
ड्राय रन' देशभरात २ जानेवारीपासून सुरू -
कोरोना लसीकरणाचा 'ड्राय रन' देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही -
प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र, त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील. महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.