नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उद्योगपती राज कुंद्रा ( Businessman Raj Kundra ) आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा ( Actress Sherlyn Chopra ) आणि पूनम पांडे यांच्यासह इतरांविरुद्ध अश्लील साहित्य असलेले व्हिडिओ वितरित केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारला. न्यायमूर्ती एमके जोसेफ आणि न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने कुंद्रा आणि इतर आरोपींना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य : दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांना अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकतो, असे आमचे मत आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर बसंत यांनी युक्तिवाद केला की या प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करत आहेत.
अश्लील व्हिडिओ प्रसारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल : या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी कुंद्रा यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. कुंद्राविरुद्ध भारतीय दंड संहिता, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अश्लील व्हिडिओ प्रसारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोप्रा आणि पांडे यांना एफआयआरमध्ये सहआरोपी करण्यात आले आहे. कुंद्राच्या वकिलांनी दावा केला की कथित बेकायदेशीर व्हिडिओची सामग्री तयार करणे, प्रकाशन किंवा प्रसारित करण्यात तो कोणत्याही प्रकारे गुंतलेला नाही, तर आरोपी म्हणून नाव असलेल्या अभिनेत्रींनी व्हिडिओ शूट करण्यास पूर्ण संमती दिली होती.