नवी दिल्ली 'व्हाय आय किल्ड गांधी' ( Plea In Supreme Court Seeks Ban On Why I Killed Gandhi ) या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.
न्यायमूर्ती इंदिरा बेनर्जी आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सिकंदर बहल याने अधिवक्ता अनुज भंडारी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
याचिकाकर्ते सिकंदर बहल यांनी त्यांच्या याचिकेत अधिवक्ता अनुज भंडारी यांच्यामार्फत कोणत्याही OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया साइट्सवर कोणत्याही प्रकारे चित्रपटाचे प्रदर्शन किंवा प्रकाशन किंवा त्यातील कोणतीही सामग्री यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
एक नागरिक म्हणून याचिकाकर्त्याला चिंतेचे कारण गंभीर आहे. परंतु नागरिकांच्या कोणत्याही मुलभूत हक्काचे उल्लंघन झालेले दिसत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने त्याला तक्रारी घेऊन उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली. चित्रपटाचे निर्माते राष्ट्रपिता महात्मा गांधींना लक्ष्य करत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. अशोककुमार त्यागी यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचा एकूण कालावधी सुमारे 45 मिनिटांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्युमेंटरीतील प्रत्येक शब्द चित्रपटात घुसडण्यात आला असून नथुराम गोडसेंना फाशीपर्यंत सर्व गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.