नवी दिल्ली : शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय स्तरावर विरोधी ऐक्याला सर्वोच्च प्राधान्य देतो आणि त्यात राहुल गांधींच्या बाबत होत असलेल्या संसदेतील निषेधांमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. आज राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. राऊत यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण ठाकरे गट राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे नाराज झालेला होता आणि विरोधकांच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.
राऊत म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी आमच्या मुद्द्यांबाबत बोललो आहेत. आम्ही खरगे यांच्या निवासस्थानी गेलो नाही. पण आम्ही विरोधकांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रात आणि देशात एकता राहावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आजच्या विरोधकांच्या बैठकीला आम्ही नक्कीच उपस्थित राहू आणि आंदोलनातही सहभागी होऊ. विरोधी पक्षांच्या ऐक्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. आम्ही राष्ट्रीय पातळीवरील सर्व विरोधी पक्षांसोबत राहू, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अदानी समुहाच्या मुद्द्यावरून आणि भ्रष्टाचारावरून सरकारवर निशाणा साधत राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केवळ विरोधकांविरुद्धच होईल, अदानींवर नाही. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि विरोधकांच्या जेपीसीच्या मागणीबद्दल तुम्ही (सरकार) का बोलत नाही? तुमचा अदानीशी काय संबंध? ईडी आणि सीबीआय फक्त आमच्यासाठी ( विरोधक ) आहेत, अदानींसाठी नाहीत? तुम्ही PMCARES निधीचे ऑडिट कराल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घोटाळ्यावर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सरकार तयार नाही. आपण प्रश्न विचारू शकत नाही का? जो प्रश्न विचारतो, त्याचे सदस्यत्व अपात्र ठरवले जाते आणि त्याला घरातून बेदखल केले जाते. राहुल गांधींच्या अपात्रतेच्या विरोधात आम्ही विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असे ते म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आणि ते म्हणाले की, त्यांना त्यांच्या अहंकारामुळे लोकसभेसाठी खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच काँग्रेस नेते ते असल्याने देशावर राज्य करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे मानतात असा आरोप केला.
हेही वाचा: जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल आला