मुरादाबाद - उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे बोललं जात आहे. यावर मुस्लीम नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदू तरुणींना बहीण मानण्याचा सल्ला मुरादाबादमधील समाजवादी पार्टीचे खासदार एस टी हसन यांनी मुस्लीम तरुणांना दिला आहे. मुस्लीम तरुणांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
लव्ह जिहाद कायदा भाजपाचे राजकीय षडयंत्र आहे. आपल्या देशात मुला-मुलींना आपला जीवनसाथी निवडण्याचे अधिकार आहेत. मुस्लीम हिंदूशी लग्न करतात. तर हिंदू मुस्लिमांशी लग्न करतात. सामाजिक दबावामुळे ते लग्न 'लव्ह जिहाद' होतं. तसेच मुस्लीम मुली हिंदू मुलाशी लग्न करत नाहीत का, त्यांच्यासाठी असा कोणताच कायदा नाही, असे ते म्हणाले.
मुस्लीम मुलांनी सर्व हिंदू मुलींना बहिण मानावं. या नव्या कायद्यामुळे मुस्लीम तरुणांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या भानगडींपासूनच तरुणांनी दूर राहावं. तसेच भाजप फक्त हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरच निवडणूक लढते. इतर घाणेरडे राजकारण एखादा पक्ष करतो. त्या पक्षाकडून दुसरी अपेक्षाही आपण काय करु शकतो, असेही ते म्हणाले.
लव्ह जिहादवरून अशोक गेहलोत यांची भाजपावर टीका -
यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लव्ह जिहादवरून भारतीय जनता पार्टीवर टीका केली होती. भाजपाने देशाचे विभाजन करण्यासाठी आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी लव्ह जिहाद हा शब्द निर्माण केला आहे. विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, त्याला आळा घालण्यासाठी कायदा आणणे पूर्णपणे घटनाबाह्य असून हा कायदा न्यायालयात टिकणार नाही. प्रेमात जिहादला स्थान नाही, असे गेहलोत म्हणाले होते.
'लव्ह जिहाद भाजपा नेत्यांच्या मुला-मुलींना लागू होता का?
लव्ह जिहादवरून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. भाजपा रिकामटेकडी आहे. तिहेरी तलाकनंतर आता त्यांनी लव्ह जिहाद आणले आहे. लव्ह जिहाद हा कायदा भाजपाच्या नेत्यांना लागू होतो का, ज्यांच्या मुला-मुलींना धर्माच्या बाहेर लग्न केले आहे ? असा खोचक सवाल त्यांनी केला.