तिरुवनंतपुरम- पठाणमथिट्टा जिल्ह्यातील सबरीमाला अयप्पा मंदिराच्या वार्षिक 'मंडाल' पूजेची तयारी पूर्ण झाली आहे. अयप्पा देवाला 'तंका अंकी' सोन्याचा पोशाख परिधान करुन पुजेला आरंभ करण्यात येईल. पूजेनंतर गेल्या ४१ दिवसापासून चाललेल्या या उत्सावाच्या पहिल्या पर्वाची सांगता होणार आहे.
असा असतो उत्सव-
मंडल पूजेच्या आगोदर 'तंका अंकी' या पोशाखाची अर्णमुला मंदिरापासून सबरीमला मंदिरापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर अयप्पा देवाला विधिवत पद्धतीने सुवर्ण पोशाख चढवला जातो. उत्सवानंतर आज रात्री ९ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतील. त्यानंतर ३० डिसेंबरला मकरविलाककू उत्सावसाठीच मंदिर पुन्हा उघडण्यात येतील. ३१ डिसेंबर ते १९ जानेवारी दरम्यान मकरविलाककू उत्सव आयोजित करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरनंतर भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्रावणकोरच्या राजाने सोन्याचा पोशाख दिला भेट-
अयप्पा देवाला परिधान करण्यात येणाऱ्या सोन्याचा पोशाख त्रावणकोरचा राजा चितिरा तिरुनल बलराम वर्मा याने दान केला होता. हा पोशाख संपूर्णपणे सोन्याचा असून त्याला 'तंका अंकी' या नावाने ओळखले जाते.
उत्सवावर कोरोनाचे सावट-
कोरोनाचा या सबरीमाला मंदिराच्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून आला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या उत्सवास आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे ठऱाविक भक्तांच्याच उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.