नवी दिल्ली - आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट अशी एस-400 ही हवाई क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत मिळणार आहेत. यासंदर्भात वक्तव्य रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी नुकतेच केले आहे. भारताने रशियासोबत वर्ष 2018 मध्ये ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासंदर्भात करार केला होता. 5.43 अब्ज डॉलर्स हा करार आहे. रशियन बनावटीची ही एस-400 जातीची 5 क्षेपणास्त्रे भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यावर भारतीय हवाई दलाला आणखी ताकद मिळू शकेल.
भारत रशिया यांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह या संरक्षण करारासंदर्भातील प्रगतीबाबत भाष्य केले. रशिया डायजेस्ट मासिकाच्या विशेष अंकात त्यांनी यासंदर्भातील वक्तव्य केले आहे. भारत-रशिया यांच्यातील सहकार्य हे बहुआयामी आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसोबत खरी मैत्री निर्माण केली आहे. त्यासोबतच परस्परांवरील विश्वास आणखी मजबूत झालेला आहे. दोन्ही देशांच्या संबंधांकडे संपूर्ण जगाचे नेहमीच लक्ष असते. 12 जून रोजी साजरा झालेल्या रशियाच्या नॅशनल डेच्या पार्श्वभूमीवर रशियन दुतावासाने त्यांच्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती प्रकाशित केली आहे.