नवी दिल्ली : रशियाकडून येणारी एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स मिसाईल ही या वर्षाअखेरीपर्यंत भारतात दाखल होणार आहे. रशियामधील भारताचे राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी याबाबत माहिती दिली. रशियाच्या एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
एस-४०० ट्रायम्फ, म्हणजेच एसए-२१ ग्रॉवलर ही एक लॉंग-रेंज मिसाईल सिस्टम आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्या लढाऊ विमानाचा ४०० किलोमीटर दूर असतानाच वेध घेण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. ही मिसाईल रशियामधील अल्माझ-अँटे या कंपनीने बनवली आहे. ही कंपनी २००७ पासून क्षेपणास्त्रे बनवत आहे. एस-४००च्या आधीचे व्हर्जन एस-३००देखील याच कंपनीने बनवले होते.
२०१८मध्ये रशिया आणि भारताच्या संयुक्त परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियासोबत ५.८ बिलियन डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार केला होता. विशेष म्हणजे, अमेरिकेने लागू केलेल्या सीएएटीएसए कायद्याच्या पार्श्वभूमीवर भारत-रशियामधील करार चर्चेचा विषय ठरला होता. कारण, सीएएटीएसए कायद्यानुसार रशिया, इराण आणि उत्तर कोरियामधील संरक्षण कंपन्यांशी करार करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्यात आले होते.
हेही वाचा : चीनच्या वाढत्या कुरापतींमुळे भारताला एस-४०० मिसाईल्सची गरज!