Samsung Galaxy M21 2021 Edition ला भारतात २१ जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. ही माहिती अॅमेझॉनने दिली आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy M21 च्या तुलनेत अपग्रेडेट कॅमेरा सोबत येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल (MH HSC result 2021 date) येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे.

बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा 21 जुलैला संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येणार आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी देखील बकरी ईदवर कोरोनाचा सावट पसरले आहे. राज्य सरकारनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी कशी करावी, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाने धुमशान घातले आहे.22 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 70 ते 120 मि मी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लशींचा तुटवडा असल्याने मुंबई पालिकेने आज लसीकरण बंद ठेवले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्यामुळे अखेर पालिकेने बुधवारी लसीकरण बंद ठेवले.

लाल किल्ला पर्यटकांना 21 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त बंद राहणार आहे. याबाबत पुरातत्व विभागाने आदेश काढले आहेत.

तृणमुल काँग्रेस 21 जुलैला शहीद दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेे. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाषण गुजराती, तामिळ, हिंदीसह विविध भाषांमध्ये पोहोचविले जाणार आहे.

भारताने प्रत्यार्पणाविरोधात केलेल्या मागणीला विरोध करत नीरव मोदीने लंडनच्या उच्च न्यायालयात पुन्हा नवीन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसला परवानगी दिलेली नाही. आज, महाराष्ट्रातील बसवरचे निर्बंध संपण्याची शेवटची मुदत आहे. मध्य प्रदेशकडून पुन्हा महाराष्ट्रातील बसला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये आजपासून पाणी कपात सुरू आहे. नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रासह शहरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणात केवळ 40 दिवस पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिक शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे
