मुंबई - महागाई दर वाढलेला असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( RBI ) रेपो रेटमध्ये (Repo Rate ) वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटची (०.५० टक्के) वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये वाढ केल्यावर लगेचच महिनाभराच्या अंतराने रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज ( Home loan), वाहनकर्ज महाग होऊ शकते.
एपीसीच्या बैठकीत निर्णय - रिझर्व्ह बँकेची तीन दिवसांची पतधोरण निर्धारण समितीची (MPC) बैठक बुधवारी संपली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये ( Repo Rate ) वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीच्या पाच सदस्यांनी महागाई आणि आर्थिक विकासावर सखोल चर्चा केली. अनियंत्रित महागाई लक्षात घेता रेपो रेट वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे सर्व सदस्यांचं एकमत झाले होते.
महिनाभरापूर्वीच केली होती रेपो रेटमध्ये वाढ - याआधी एमपीसीने मे महिन्याच्या सुरुवातीला तातडीने आयोजित केलेल्या बैठकीतून रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंटची वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल अशी शक्यता आहे. ही वाढ झाल्यास रेट रेट ५.५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
महागाई दर - एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता, जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर सहा टक्क्यांच्या पुढे आहे. एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई दर वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता.
हेही वाचा - दिल्ली मुंबईसह गुजरातमध्ये अल-कायदाची आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी