मथुरा (उत्तर प्रदेश) Aditya Thackeray : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सोमवारी (२७ नोव्हेंबर) धार्मिक नगरी मथुरा-वृंदावनात पोहोचले. यावेळी बोलताना, अयोध्येतील भव्य राम मंदिर हे शिवसेनेची देण असल्याचं ते म्हणाले.
अयोध्येतील भव्य राम मंदिर शिवसेनेची देण : आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी मथुरा-वृंदावनच्या धार्मिक सहलीवर आलो आहे. त्यामुळे राजकीय प्रश्नांची उत्तरं देणार नाही. मी एवढंच सांगतो की, २०१८ मध्ये आम्ही अयोध्येत रामाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर केंद्रात बसलेल्या सरकारवर दबाव आणला गेला आणि अयोध्येत मंदिर तयार होत आहे. मी देवाकडे काही मागायला आलो नाही", असं ते म्हणाले.
श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरालाही भेट दिली : आदित्य ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत मथुरेत पोहोचले होते. विश्राम घाटावर यमुनेची पूजा केल्यानंतर त्यांनी दुग्धा अभिषेक केला. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरालाही भेट दिली. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या सोबत बांके बिहारी मंदिरात पूजा केली. तेथून ते रंगनाथ मंदिरात गेले. येथून मथुरा विश्राम घाटावर यमुनेची पूजा करून त्यांनी द्वारकाधीश मंदिर आणि श्री कृष्णजन्मभूमी मंदिराकडे प्रस्थान केलं.
प्रियंका चतुर्वेदी मथुरेतून निवडणूक लढवणार? : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत मथुरा ही अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते. येथून भाजपच्या खासदार हेमा मालिनी या दोनदा विजयी झाल्या आहेत. त्याचवेळी, आता लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे मथुरेतून उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र आदित्य ठाकरे सोमवारी याबाबत काहीही बोलले नाही. त्यांनी फक्त ते धार्मिक सहलीवर आल्याचं सांगितलं.
हेही वाचा :