नवी दिल्ली : मोदी सरकारने नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून पंतप्रधान मेमोरियल म्युझियम केल्याने चांगलाच वाद रंगला आहे. यावर राहुल गांधी यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. पंडित नेहरु यांना त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कर्मामुळे ओळखण्यात येते, त्यांच्या नावामुळे नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला. लेहच्या दोन दिवसी दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले राहुल गांधी : पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यामुळे पंडित नेहरु यांचे कार्य पुसता येणे शक्य नाही. पंडित नेहरु यांची ओळख त्यांचे चांगले कर्म आहेत, त्यांचे नाव नाही, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी हे लेहच्या दोन दिवशीय दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या नंतरच लेहच्या दौऱ्यावर जाण्याचे ठरवले होते, मात्र तेव्हा शक्य झाले नाही. आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते बेल्जियम, नॉर्वे आणि फ्रान्सचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे नाव बदलण्याचा वाद : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील विविध वास्तू, शहरे आणि रस्त्यांची नावे बदलण्याची मोहीम सुरु झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव 2016 मध्ये ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रस्तावाला एनएमएमएलने मंजुरी देत नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्यासाठी मंजुरी दिली होती. अगोदर नेहरु मेमोरियल म्युझियमला तीन मूर्ती लेन भवनच्या नावाने ओळखले जात होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांचा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असा आरोप केला आहे. मात्र पंडित नेहरुंच्या कामाला कसे नष्ट करणार, असा सवालही जयराम रमेश यांनी यावेळी सरकारला केला आहे.
हेही वाचा -