नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 12 जुलैपासून जोरदार प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाला मोठा वाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसला पुन्हा बळ मिळण्याची संधी : यासंदर्भात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेसला पुन्हा बळ मिळण्याची मोठी संधी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यातील नेत्यांना बुधवारपासूनच प्रचाराला गती देण्यास सांगितले आहे. राहुल गांधी आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराबाबत चर्चा केली.
कॉंग्रेसचे नेते गावागावांना भेटी देणार : पाटील यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी पक्षाच्या व्यवस्थापकांना महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांकडे देण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील गावांना भेटी द्याव्यात, अशी राहुल गांधींची इच्छा आहे. गेल्यावर्षीच्या त्यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सर्वोत्कृष्ट होता असे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना सप्टेंबरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मोठी पदयात्रा काढण्यास सांगितले. तसेच नोव्हेंबरमध्ये त्यांनी संयुक्त मोर्चा काढण्यास सांगितले असून त्यात सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होतील.
शरद पवार यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा : सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांना महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठी संधी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या नेत्यांनी संघटनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देईल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. पाटील म्हणाले की, राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असून येत्या निवडणुकीत ते भाजपला धडा शिकवणार आहेत. ते म्हणाले की, पक्षाची प्राथमिकता राज्यात पुन्हा ताकद मिळवणे आणि मित्रपक्षांसोबत भाजपचा मुकाबला करणे ही आहे. जागावाटपावर नंतर चर्चा होईल, असे ते म्हणाले.
'काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडणार' : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सुमारे चार तास महाराष्ट्रातील परिस्थितीवर राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. पाटील म्हणाले की, 'काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडून पुढील वर्षी भाजप-शिवसेना सरकारचा पराभव करेन'. राहुल गांधी आणि खरगे यांही राज्यातील नेत्यांना एकजूट राहून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले. राज्यात काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजली असून विधानसभा निवडणुकीनंतर आपण राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :