हैदराबाद - दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. माझ्या नात्यातील पाथर्डी आणि संगमनेर येथील दोन कुटुंबातील आई आणि मुलगा कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे आरोग्य हेच धनसंपदा आहे हे विसरून चालणार नाही, असे म्हणत राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
हैदराबादला अनेक हॉस्पिटलमध्ये नांदेड, लातूर या सरहद्दीवरील जिल्ह्यातील रुग्ण आहेत, डिस्चार्ज होत आहेत, काही खूपच उशिरा आले त्यांना मात्र वाचवण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत. बेड उपलब्ध करुन देणे, प्लाझ्मा डोनर शोधणं अशी मदत करत असल्याचे महेश भागवत यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
सर्वांनी काळजी घ्या..
आपली प्रतिकारशक्ती वाढवा. मास्क सक्तीने वापरा, हात धूत जा, सार्वजनिक ठिकाणी खाणं, चहा पिणं टाळून एकट्याने किंवा परिवारातील व्यक्ती सोबतच ते करा कारण बाहेरच्या व्यक्ती कोण सुपर स्प्रेडर आहेत ते कळत नाहीत. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मी आणि वडील आजारी म्हणून सोलापूरला गेलो होतो. सर्व मित्रमंडळी भेटली. त्या रात्रीच्या जेवणानंतर 8 दिवसात 8 पैकी माझ्यासह 5 जण पॉझिटिव्ह झालो, आणि कोरोनाशी लढत बाहेर आलो. माझी RTPCR दहाव्यांदा निगेटिव्ह आली होती आणि ताप टायफॉईडमुळे येतो ते टेस्टमध्ये समजलं. मात्र टायफॉईड औषधानेही तो कमी होत नव्हता म्हणून चेस्ट सिटी स्कॅन केला तेव्हा HRCT टेस्टमध्ये लंग इन्फेक्शन स्कोर 5 निदान झाले. मग कोविड ट्रीटमेंट घेत 5 दिवस हॉस्पिटलमध्ये आणि 10 दिवस घरीच क्वारंटाईन करून घेतले. 15 दिवस स्वतःला सकारात्मक विचार करत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न होता. पण, बऱ्यापैकी नकारात्मक विचार जास्त होते आणि कुणाशीही बोलण्याची किंवा मोबाईल चॅटची इच्छा होत नव्हती. असो हे ही दिवस जातील, म्हणत त्यातून सुखरूप बाहेर आलो. आता व्यवस्थित सर्व रुटीन चालू असल्याचे म्हणत महेश भागवत यांनी आपला अनुभव सांगितला.
सर्वांनी लस घेणं गरजेचं..
आपण लस घेतली नसेल तर घ्या. काहीही साईड इफेक्ट नाहीत. मी 6 फेब्रुवारीला पहिला डोस घेतला होता आणि 25 फेब्रुवारीला मला कोविड झाला तेव्हा काही प्रमाणात लसीच्या पहिल्या डोसमूळे अँटिबॉडीज तयार झाल्याचं डॉक्टरानी सांगितले. माझ्या राचाकोंडा पोलीस आयुक्तालयातील 6,000 पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. आजपर्यंत 1,233 पॉझिटिव्ह केसेस नमूद झाल्या आहेत. त्यात 100 लोकं सध्या अॅक्टिव्ह आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे बाकी 95 % मंडळी होम क्वारंटाईन होते. लसीच्या दुसऱ्या डोसच्या 15 दिवसानंतर शरीरात पूर्णपणे अँटिबॉडीज तयार होतील. आणि त्यांनतर जरी तुम्ही पॉझिटिव्ह झाला तरी तुम्हाला न्युमोनिया होण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात ठेवा. अंगावर दुखणं काढू नका. आता कोरोनाचे नवीन लक्षणे ही आहेत, जसे डोळे लाल होणे, जुलाब, पोटदुखी, अंग दुखी बाकी ताप येणं, खोकला, सर्दी, तोंडाला चव नसणे, वास न येणे ही जुनी लक्षणे आहेतच. तेव्हा घाबरून न जाता वेळीच ट्रीटमेंट घ्या. रॅपिड टेस्ट निगेटिव्ह असली आणी लक्षणे दिसून येतच आहेत तर RTPCR टेस्ट करावी आणि ती ही निगेटिव्ह पण ताप चालूच आहे, जुलाब, थकवा, चव नसणे, सर्दी , खोकला वगैरे थांबत नसेल तर वेळीच चेस्टचा सिटी स्कॅन HRCT करून घ्या. 25 पैकी स्कोअर किती येतो पाहून डॉक्टरांचा सल्ल्याने लगेचच ट्रीटमेंट सुरू करा. ज्यांना रक्तदाब आणि डायबेटीसचा आजार आहे त्यांनी जास्त काळजी घ्या. ऑक्सिजन लेव्हल SPO2 95 पेक्षा कमी असेल तर पोटावर झोपणं गरजेचं आहे. वैद्यकीय सल्ल्याने हे सर्व करावं, असे आवाहन महेश भागवत यांनी जनतेला केले आहे.
आरोग्य हेच धनसंपदा आहे हे विसरून चालणार नाही. बचेंगे तो और लढेंगे।