पुरी (ओडिशा) Puri Jagannath Temple Stampede : पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आज (१० नोव्हेंबर) सकाळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत सुमारे २० भाविक जखमी झालेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. जखमींना येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
भाविकांची गर्दी कारणीभूत : श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) चे मुख्य प्रशासक रंजन कुमार दास यांनी सांगितलं की, शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेला भाविकांची मोठी गर्दी कारणीभूत होती. पवित्र कार्तिक महिन्यात पुरीच्या जगन्नाथ मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. जखमींमध्ये बहुतांश वृद्ध लोक होते. दास म्हणाले की, मंदिरात भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावं यासाठी आम्ही व्यवस्था वाढवत आहोत.
१० जण बेशुद्ध : मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील मंगल आरतीनंतर ही घटना घडली. जखमी झालेल्या २० भाविकांपैकी १० जण बेशुद्ध झाले आहेत. मंदिराच्या आत भक्तांची गर्दी वाढल्यानंतर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. जखमींवर आधी मंदिरातच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुरीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.
पोलीस अधीक्षकांनी चेंगराचेंगरी झाल्याचं नाकारलं : रंजन दास म्हणाले की की, जगन्नाथ मंदिर पोलिसांनी (जेटीपी) जखमी भाविकांना मदत केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बहुतेक जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पुरीचे पोलीस अधीक्षक केव्ही सिंह यांनी मात्र चेंगराचेंगरी झाल्याची बाब नाकारली. 'मंदिरात गर्दी होती, मात्र चेंगराचेंगरी झाली नाही', असं ते म्हणाले. 'गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या एकूण १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकातही चेंगराचेंगरी : दुसरीकडे, कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील हसनंबा मंदिरातही चेंगराचेंगरीची घटना घडली. येथे विद्युत तार तुटल्यामुळे काही लोकांना विजेचा धक्का बसला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी १.३० वाजता तुटलेल्या वायरमुळे विजेचा धक्का बसला. यामुळे लोक घाबरले आणि इकडेतिकडे धावू लागले. तीन जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
हेही वाचा :