मोहाली (पंजाब) - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या निवास्थानाला घेराव घालणार्या शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यासह बहुजन समाज पार्टी (बसपा) चे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी आणि रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला.
कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी एसएडीचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यासह अनेक अकाली व बसपा नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. बादल यांच्या व्यतिरिक्त मोहाली पोलिसांनी आमदार बिक्रमसिंह मजीठिया, एनके शर्मा आणि माजी मंत्री दलजितसिंग चीमा, गुलजारसिंग राणीके, पंजाब बसपाचे अध्यक्ष जसबीरसिंग यांच्यासह 300 हून अधिक अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर कलम 188 (लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला आहे.
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढणार दिसणार आहेत. युती केलेल्या अकाली दल-बसपाची हा पहिला संयुक्त मोर्चा होता. यावेळी विविध मुद्द्यांवरून राज्यात काँग्रेसप्रणीत सरकारविरोधात घोषणा दिल्या. मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते आणि विविध स्तरांवर बॅरिकेड्स लावली गेली होती.
अकाली दल आणि बसपा 25 वर्षानंतर एकत्र -
याआधीही बसपा आणि अकाली दल या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली आहे. 1996 च्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंजाबमधून निवडणुका जिंकल्यानंतर तत्कालीन बसपा सुप्रीमो कांशीराम लोकसभेत गेले होते. यंदा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाशसिंग बादल आणि त्यांचा मुलगा सुखबीरसिंग बादल यांनी मायावतींशी हातमिळवणी करून राज्यातील मागासवर्गीय आणि दलित मतांवर कब्जा करण्याची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये दलितांची 32 टक्क्यांहून अधिक व्होट बँक आहे. राज्यात एकूण 117 विधानसभा जागांपैकी बसपा 20 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, तर उर्वरित 97 जागांवर अकाली दलाचे उमेदवार लढतील.