जयपूर Karni Sena President Killed : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी (५ डिसेंबर) जयपुरातील त्यांच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जयपूरसह राजस्थानच्या विविध भागात तणावाचं वातावरण आहे. बुधवारी समाजाकडून राजस्थान बंदची हाक देण्यात आली होती. या बंददरम्यान अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलकांनी जयपूर-कनकपुरा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन रोखली. याशिवाय पोलिसांच्या उपस्थितीत पेट्रोल पंपावर तोडफोड झाल्याची घटनाही समोर आली आहे.
केंद्राकडून फौजफाटा मागवला : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर राज्यात निदर्शनं आणि आंदोलनं होत आहेत. हे निदर्शनं हिंसक होण्याचीही शक्यता आहे. हे पाहता राज्य सरकारनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांची मागणी केली. राज्य सरकारनं गृहमंत्रालयाला पत्र लिहून पॅरा मिलिटरी फोर्सच्या तीन तुकड्या तातडीनं पाठवण्याची विनंती केली आहे. बुधवारी रात्रीपासून या तुकड्या तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद साधला : राज्यातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्य सचिव उषा शर्मा, डीजीपी उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यपालांनी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशीही संवाद साधला आणि त्यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.
पर्यटन स्थळं बंद : गोगामेडी हत्याकांडानंतर पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जयपूरमधील सर्व पर्यटनस्थळं बंद ठेवण्यात आली होती. अल्बर्ट हॉल, जंतर मंतर, हवा महल आणि आमेर किल्ला यासह सर्व पर्यटन स्थळे बंद राहिली. यामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन परतावं लागलं. जयपूरमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू असून शहराचा समृद्ध वारसा पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. मात्र पर्यटनस्थळं बंद असल्यानं पर्यटकांची निराशा होत आहे.
हेही वाचा :