आदिलाबाद - तेलंगणातील आदिलाबाद शहरातील पोलीस ठाण्यासमोर एका समाजाच्या सदस्यांनी त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर निदर्शने करण्यात आली.
एका 27 वर्षीय व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर काही अपमानास्पद शब्द पोस्ट केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. परंतु, दुसर्या समुदायाच्या लोकांनी संतप्त होऊन शनिवारी रात्री स्टेशनसमोर जमून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली, असे पोलिसांनी सांगितले.
आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमाराचा अवलंब करण्यात आला. आंदोलनानंतर तणाव निर्माण झाला, असे पोलीस म्हणाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली, अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मोबाईल फोनचे दुकान चालवणाऱ्या अटक केलेल्या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया स्टेटसवर धर्माचा अपमान करणारा संदेश पोस्ट केला. त्याच्यावर IPC कलम 295A अर्थात जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी द्ली.
गस्त वाढवण्यात आली आणि पिकेट्स तैनात करण्यात आल्या. आज परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे, असे आदिलाबादचे पोलीस अधीक्षक डी उदय कुमार यांनी सांगितले. आंदोलन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.