बेंगळुरू (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक दौर्यावर आहेत. कर्नाटकमध्ये त्यांचा एक विशाल रोड शो पार पडणार आहे. त्यानंतर ते विविध विकास कामांचे लोकार्पण करतील. कर्नाटक दौऱ्यात ते 16,000 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. यात बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे आणि दुरूस्ती केलेले होसापेटे स्टेशनचे उद्घाटन यांचा समावेश आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हलचालींमध्ये वाढ : राष्ट्रीय महामार्ग 275 च्या 118 किलोमीटर लांबीच्या बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या सहा पदरी कामासाठी ८,४८० कोटी खर्च आला आहे. बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानच्या बहुप्रतिक्षित एक्स्प्रेस वेचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ट्विटमध्ये सांगितले. पंतप्रधानांचा हा दौरा दक्षिणेकडील राज्यात निवडणुकांच्या हलचाली वाढत असल्याचे एक चित्र आहे. कर्नाटकात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर काँग्रेस नेत्यांना आपली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्याचा विश्वास आहे.
मुख्यमंत्र्यांसह अनेक कार्यकर्त्यांची हजेरी : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी दक्षिण भारतात आपले पाय रोवण्यासाठी कर्नाटकमधील विजय हा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व सध्या सत्तेत असलेले एकमेव दक्षिणेकडील राज्य कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेलंगणा आणि केरळमध्ये भाजपने जोरदार कंबर कसली असली तरी प्रादेशिक समीकरणांचा विचार करता त्यांच्यासाठी हे कठीण काम आहे. पंतप्रधान मोदींचा आजचा कर्नाटक दौरा यशस्वी व्हावा यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.