पुद्दुचेरी - केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नारायणसामी सरकार कोसळल्यानंतर नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे केली होती. पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आज राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अधिसूचना जारी करण्यात आली.
विधानसभेत 22 फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारायणसामी यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा स्वीकारला. आमदारांनी राजीमाना दिल्याने काँग्रेस सरकारकडे 11 तर विरोधकांकडे 14 असे संख्याबळ होते.
काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूबरोबरच पुदुच्चेरीचाही दौरा केला. पुद्दुचेरीतील कारिकल जिल्ह्यातील NH45-A या ५६ कि.मी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. सुमारे 2 हजार 426 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. याच जिल्ह्यात मोदी मेडिकल कॉलेजच्या इमारतीचीही पायाभरणी केली. हा प्रकल्प सुमारे 491 कोटी रुपयांचा आहे. पुद्दुचेरीत एका बंदराच्या कामाचा शुभारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे.
पुद्दुचेरी हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. 30 निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून 33 आमदारांची विधानसभा आहे. भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले आहे. पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. 11 विरोधात 14 अशा फरकाने नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरले.
पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.