लखनऊ - कोरोना संसर्ग रोखण्याठी जगभरातील संशोधक लस तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत. अद्याप कोणत्याही कंपनीची लस तयार झाली नाही. सर्व लसी विकासाच्या विविध टप्प्यांवर असून त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्याआधीच उत्तरप्रदेश सरकारने कोरोना लसीकरण कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. लस तयार झाल्यानंतर कोठे ठेवण्यात येईल यासाठी उत्तरप्रदेश सरकारची चाचपणी सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात ३. ५ कोटी नागरिकांचे होणार लसीकरण
लस मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुमारे साडेतीन कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन उत्तरप्रदेश सरकारने केले आहे. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वात पहिले आरोग्य कर्मचारी आणि वयोवृद्धांना लस टोचण्यात येईल. त्यानंतर सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत सात लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस टोचण्यात येईल, असे नियोजन राज्याने केले असून जवळपास सर्वच राज्यांचे नियोजन याच धर्तीवर आहे.
१५ डिसेंबरपर्यंत तयारी पूर्ण करणार
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना सर्व राज्यांनी लसीकरणाची तयारी करण्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्याने लसीचा साठा ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. निर्धारीत वेळेत सर्व तयारी पूर्ण करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.