फुलबनी (ओडिशा) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात पोलिसांविरोधात लोकांचा रोष पाहायला मिळाला. जिल्ह्यातील फिरिंगिया पोलीस स्टेशन संतप्त जमावाने पेटवले. पोलिसांच्या वाहनातूनच गांजाची तस्करी होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकांनी पोलीस स्टेशनसमोर निदर्शने करत स्टेशनला आग लावली. या घटनेत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ला झाला. सध्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलीस प्रतिबंधित पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचा आरोप : स्थानिक लोकांच्या आरोपानुसार, फिरिंगिया पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक तपन कुमार नाहाका आणि त्यांचे कर्मचारी प्रतिबंधित पदार्थाच्या तस्करीमध्ये गुंतलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी गांजाने भरलेली पोलिस व्हॅन फिरिंगियाचे सरपंच, माजी सरपंच आणि स्थानिक लोकांनी अडवली. तेव्हा हे वाहन व्यापाऱ्याला विकण्यासाठी अंमली पदार्थ घेऊन जात होते. गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो कंधमालच्या एसपींना पाठवला. गावकऱ्यांनी तपन कुमार नाहाका आणि इतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्याने स्थानिक संतप्त : मात्र दोन दिवस झाले तरी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त स्थानिकांनी फिरिंगिया ब्लॉक चौकात रास्ता रोको करून फुलबनी-बालीगुडा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत केली. आंदोलकांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. काही वेळानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर गोंधळ घातला आणि पोलिस स्टेशनची तोडफोड केली. त्यानंतर या लोकांनी पोलीस स्टेशनला आग लावली.
एसडीपीओवर हल्ला केला : पोलीस स्टेशनला आग लावल्यानंतर हिंसक जमावाने एसडीपीओवर देखील हल्ला केला. यासह पोलिस अधिकाऱ्यांचाही पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एसडीपीओच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. संतप्त जमावाने इतर पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ला केला.
हेही वाचा :