हजारीबाग : पोलंडच्या तरुणीचे इन्स्टाग्रामवर हजारीबागच्या तरुणासोबत मन जुळल्याने तिने थेट त्याचे गाव गाठले. मात्र गावात आल्यानंतर उकाड्याने त्रस्त झालेल्या या पोलंडच्या प्रेयसीसाठी दोन एसी लावावे लागले. पोलंडच्या या तरुणीने आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह सातासमुद्र पार केला, मात्र त्यामुळे तरुणाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हजारीबागच्या या तरुणाची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पोलक बार्बरा असे या पोलंडवरुन भारतात आलेल्या प्रेयसीचे नाव असून ती सध्या हजारीबाग जिल्ह्यातील खुत्रा गावात प्रियकर मोहम्मद शादाबसोबत राहत आहे.
बार्बरा आणि शादाबची इंस्टाग्रामवर झाली मैत्री : बार्बरा आणि शादाब दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे आहे. बार्बरा तिच्या पतीपासून घटस्फोटित आहे. शादाबने तिच्याशी लग्न करून पोलंडमध्ये स्थायिक व्हावे, अशी तिची इच्छा आहे. बार्बरा 45 वर्षांची आहे तर तिचा प्रियकर शादाब 35 वर्षांचा आहे. दोघांची 2021 मध्ये इंस्टाग्रामवर मैत्री झाली. गप्पा मारता मारता दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. बार्बराने भारतात येण्यास व्हिसासाठी अर्ज केला. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर काही दिवसांपूर्वी बार्बराला व्हिसा मिळताच ती हजारीबागला पोहोचली. काही दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर ती गेल्या पाच दिवसापासून शादाबच्या गावात त्याच्या घरी राहत आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या बार्बरासाठी लावले दोन एसी : पोलंडवरुन भारतातील हजारीबागला आलेल्या बार्बराला गावात पोहोचताच उकाड्याने त्रास दिला. त्यामुळे उकाड्यापासून बार्बराचा बचाव करण्यासाठी शादाबला दोन एसी लावावे लागले. बार्बरा आणि तिच्या मुलीसाठी शादाबच्या घरात नवीन रंगीत टीव्हीही बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शादाबची प्रेयसीही त्याच्या घरातील त्यांना कामात मदत करत आहे. शेण काढून ती कचराही साफ करते. मात्र बार्बराला पाहण्यासाठी दररोज हजारो नागरिक त्यांच्या घरी पोहोचत आहेत. यामुळे ती अस्वस्थ झाली आहे. तिला भारत हा एक अतिशय सुंदर देश वाटला, इथली माणसंही खूप छान आहेत, पण जेव्हा दिवसभर माणसं आपल्याला घेरतात, तेव्हा मी अस्वस्थ होत असल्याचे तिने सांगितले.
बंगला, गाडीसह आलिशान आयुष्य सोडून बार्बरा आली गावात : परदेशी महिला गावात पोहोचल्याची माहिती मिळताच हजारीबाग मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक राजीव कुमार आणि परिसराचे निरीक्षक अभिषेक कुमार यांनी खुत्रा गाठले. यावेळी या अधिकाऱ्यांनी बार्बराशी संवाद साधला. तिने आपला व्हिसा पोलीस अधिकाऱ्यांना दाखवला. येत्या काही दिवसात ती आपल्या देशात परतणार असल्याचे बार्बराने सांगितले. शादाबला पोलंडचा व्हिसा मिळवून देण्यासाठी ती प्रयत्न करेल असेही तिने यावेळी स्पष्ट केले. बार्बरा तिथे नोकरी करते, तिच्याकडे बंगला, गाडी सर्वकाही आहे. मात्र आपल्या प्रियकरासाठी बार्बरा सारे काही सोडून हजारीबागला आली आहे. दुसरीकडे शादाबने हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा केला आहे. करिअरच्या शोधात पोलंडला जायचे असल्याचे तो सांगतो. त्याने बार्बरासोबत लग्न करावे अशी त्याची इच्छा असल्याचेही त्याने स्पष्ट केले.