भोपाळ (मध्य प्रदेश) - नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्यानंतरही पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) फसवणूक सुरुच आहे. पीएनबीच्या रोखपालाने (कॅशियर) बँकेतील तीन कोटी रुपये चोरले आहेत. ही घटना मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये घडली आहे.
राजकुमार नरवारिया हे उज्जैन जिल्ह्यातील बादनगरमध्ये पीएनबीमध्ये मुख्य रोखपाल (कॅशियर) म्हणून कार्यरत होता. त्याने बँकेचे ३ कोटी रुपये चोरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोखपाल नरवारियाला अटक केली आहे. हा रोखपाल इंदूरमधून पळून गेला होता.
हेही वाचा-‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...
ग्राहकांचे पैसे जमा न करता पीएनबीची फसवणूक-
बँकेचे व्यवस्थापक अजय कुमार राम यांनी नरवारिया याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. रोखपालाने ६ ग्राहकांकडून १५ जुलै २०१७ ते २ ऑगस्ट २०१९ पर्यंत ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र, त्याने ग्राहकांचे सुमारे ३ कोटी रुपये बँकेत जमा केले नाहीत.
हेही वाचा-तेलंगाणामधील टाळेबंदी रविवारपासून संपूर्णपणे रद्द
आरोपीला न्यायालयीन कोठडी-
रोखपाल बेपत्ता झाल्यानंतर ग्राहकांनी बँक व्यवस्थापकाला रोखपालबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदविली. खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्याने आरोपीला इंदूरमध्ये शुक्रवारी अटक केली. या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपी रोखपालाला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.