नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंदीगडमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी प्रकाशसिंग बादल यांना श्रद्धांजली वाहिली. बादल यांनी मंगळवारी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) ज्येष्ठ नेत्याला आठवडाभरापूर्वी श्वासोच्छवासाच्या तक्रारीनंतर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बादल यांच्या निधनानंतर पंजाबमध्ये गुरुवारी राज्यभरात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर केंद्र सरकारने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रीय दुखवटा असल्याने देशभरातील ध्वज दिवसभर अर्ध्यावर फडकणार आहेत. तर सर्व सरकारी मनोरंजन कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनामुळे शिरोमणी अकाली दलाने जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी असलेला दोन दिवसांचा निवडणूक कार्यक्रम रद्द केला. तर भाजपनेदेखील एक दिवसाचा कार्यक्रम रद्द केला आहे.
बादल हे भारतीय राजकारणातील एक महान व्यक्तिमत्त्व- बादल यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मंगळवारी शोक प्रगट केला होता. पंतप्रधानांनी ट्विट म्हटले, की प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. बादल हे भारतीय राजकारणातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. बादल भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एक महत्त्वाचे राजकारणी होते.
भारताचे नेल्सन मंडेला म्हणून केले होते कौतुक- प्रकाशसिंग बादल यांचे राजकारणात चांगलेच वजन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करायचे. बादल यांनी 75 वर्षे यशस्वी राजकीय जीवन जगले. या काळात ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री बनले. तर सलग 11 निवडणुका जिंकल्या आहेत. पूर्वीपासूनच प्रकाश सिंह बादल आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध राहिले होते. एकदा पंतप्रधान मोदींनी बादल यांना 'भारताचे नेल्सन मंडेला' म्हटले होते. दरम्यान, इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांचा त्यांनी गौरव केला.