नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र दिल्लीत पूर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिंतेने ग्रासले असून त्यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना फोन करुन पुराचा आढावा घेतला. याबाबतची माहिती नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी ट्विट करुन दिली आहे. नायब राज्यपाल यांनीही पूरग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली होती.
दिल्लीच्या हितासाठी लागेल ती मदत करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पुराच्या पाण्याने केलेल्या नुकसानाचा नायब राज्यपालांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्लीच्या हितासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सहून फोन करून दिल्लीतील पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत देऊन दिल्लीच्या हितासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत गुरुवारी दुपारी नायब राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली.
शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश : दिल्लीत पुराच्या पाण्याने हाहाकार उडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत रविवारपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतर राज्यातून दिल्लीत येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शक्यतो घरून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना हे स्वतः पूरग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. यादरम्यान निर्माण झालेली परिस्थिती पाहता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना दिले आहेत.
यमुनेची पाण्याची पातळी 208.60 मीटर : दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी दुपारपासून 208.60 मीटरच्या आसपास स्थिर आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या 12 टीम कार्यरत आहेत. गुरुवारी दिल्लीतील कश्मीर गेट, लाल किल्ला, राज घाट आणि आयटीओ आदी प्रमुख ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. दिल्लीत पूरस्थिती गंभीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीच्या पुरावरुन पत्र लिहिले आहे.
हेही वाचा -