नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ब्रिक्स परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या समुहाची वार्षिक शिखर परिषद आहे. या बैठकीला ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा उपस्थित राहतील. या बैठकीत अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नवीन विकास बँकेचे अध्यक्ष मार्कोस ट्रॉयजो, ब्रिक्स बिझनेस कौन्सिलचे हंगामी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या हंगामी अध्यक्षा डॉ.संगीता रेड्डी यावेळी उपस्थित असतील. यावेळी शिखर परिषदेची थीम 'ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य'' आहे.
भारताने चार प्राधान्य क्षेत्रांची ब्लूप्रिंट तयार केली आहे. यामध्ये बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा, दहशतवादविरोधी, SDGs साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा वापर आणि लोकांमध्ये संपर्क वाढवणे यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी गोवा शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. ब्रिक्सचे 15 वे स्थापना वर्ष आहे.
हेही वाचा - काय आहे 'ब्रिक्स'..?